पुस्तक परिचय: पेशवाई

 'दुसरं काही वाचायला वेळच मिळत नाही ', ही तक्रार मी या जन्मात कधी करेन, असं वाटलं नव्हतं. पण गेले काही दिवस तसं झालं खरं. एक तर लायब्ररी बंद, आणि अमेझॉनच्या खोऱ्यातनं काही मागवावं, तर कोरोनाही नेमका भेटीदाखल हजर व्हायचा, ही भीती! आताच काही दिवसांपूर्वी तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा ग्रंथालयात गेले. ती वास्तू, त्यातली पुस्तकं पाहून ' आजि म्या ब्रह्म पाहिले' असा आनंद झाला. यावेळी दोन अगदी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचायला मिळाली. पहिलं रवींद्र गुर्जर लिखित सत्तर दिवस आणि दुसरं कौस्तुभ कस्तुरे लिखित पेशवाई . सत्तर दिवस बद्दल लिहीनच, पण आत्ता पेशवाई बद्दल थोडंसं. 


पुस्तक : पेशवाई

लेखक: कौस्तुभ कस्तुरे

प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन

पृष्ठ संख्या: नक्की आठवत नाही, पण सर्वसाधारण वाचकांच्या आवाक्यातली आहे, हे महत्वाचं.

किंमत: मी लोटीस्मामधून घेतलं असल्यामुळे मला निःशुल्क मिळालं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही! 


    मुळात पेशवाई या विषयावर सहज उपलब्ध होणारी आणि प्रसिद्ध असलेली पुस्तकं किंवा कादंबऱ्या म्हणजे रणजित देसाईंची स्वामी, ना सं इनामदार लिखित राऊ, झुंज, झेप आणि शिकस्त आणि मंत्रावेगळा. मी साधारण दहावी अकरावीत असताना या कादंबऱ्या वाचल्या होत्या. स्वामी म्हणजे ' true definition of love ' असं तेव्हापासून मनात पक्कं बसलं आहे. कुणी अतिरंजित म्हणा, ललित म्हणा किंवा काहीही म्हणा, पण स्वामी सारखी दुसरी कादंबरी शोधून सापडायची नाही. राऊ बद्दलही तेच. कसली भारी love story आहे ना, हीच पहिली प्रतिक्रिया. त्या वेळी या कादंबऱ्या वाचून मला आपण आपला मराठ्यांचा इतिहास वाचतोय , असं वाटायचं. हे म्हणजे current affairs चा अभ्यास करायला तासनतास न्यूज चॅनल लावून बसण्यासारखं आहे. आपल्याला जरी वाटलं की आपण नवं काहीतरी वाचतोय, ऐकतोय, तरी प्रत्यक्ष आपल्या ज्ञानात गुंजभरही भर पडत नाही. राऊ जवळपास सर्वांनी वाचलेलं असतंच. आधीच मी हे क्लिअर करते, की माझा ना सं इनामदार यांच्या लिखाणावर अजिबातच आक्षेप नाही. पण त्या कादंबरीचं नाव जरी राऊ असलं, तरी कादंबरी ही जवळपास बाजीराव मस्तानी अशीच आहे. आणि या कादंबरीवर so called आधारित बाजीराव मस्तानी movie म्हणजे 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असा आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे. 


    बाकी स्वामी हीसुद्धा मुळात एका नात्याची किंवा एका जोडप्याची गोष्ट आहे. त्यातून माधवराव पेशव्यांच्या राजकारणातील कर्तृत्वाची ओळख पटू शकत नाही. नारायणराव पेशवे हे मराठी साहित्यात ' काका मला वाचवा' या एका वाक्यासाठीच जास्त ओळखले जातात. झेप, झुंज अनुक्रमे यशवंतराव होळकर आणि त्रिंबकजी डेंगळे यांच्या जीवनावर आधारित आहेत. या दोन व्यक्ती आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचं श्रेय इनामदारांना नक्कीच द्यायला हवं, कारण रिसासती व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिखाणात या दोन व्यक्तींचा उल्लेख मला तरी आढळलेला नाही. शिकस्त कादंबरी सदशिवभाऊ पेशवे यांच्या पत्नी पार्वतीबाई पेशवे यांच्या जीवनावर बेतलेली आहे. आणि मंत्रावेगळा दुसरे बाजीराव पेशवेंबद्दल आहे. या सगळ्या कादंबऱ्या विचारात घेतल्या, तर त्या व्यक्तिकेंद्रित अधिक आहेत. तसं असणं चूक आहे, असं अजिबात नाही. पण हे एवढंच वाचन इतिहासाची माहिती मिळवायला नक्कीच पुरेसं नाही. कॅप्टन वासुदेव बेलवलकर यांचीही पेशवाई कालखंडावर आधारित पुस्तकं आहेत. मी त्यातील बाळाजी विश्वनाथ आणि माधवराव पेशवेंवर आधारित कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्या कादंबऱ्या ऐतिहासिक विषयावर आधारित असल्या, तरी जास्त संवादात्मक आहेत. आणि लिखाणाची शैली खूपशी ललित साहित्यासारखी आहे. थोडीफार माहिती नक्की मिळू शकेल ; पण आधीच नमूद केल्याप्रमाणे, अधिक व्यक्तीनिष्ठ असल्यामुळे "ज्ञानात भर" हा उद्देश या कादंबऱ्या वाचून सफल होईल, असं मला वाटत नाही. 


   या सगळ्या कादंबऱ्या वाचून माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी अशा, की पेशवे आणि त्यांचा कालखंड यावर लिखाण भरपूर झालं असलं, तरी त्यात वस्तुनिष्ठता फार कमी आहे. इथे आवर्जून सांगेन, की प्रत्येक लेखकाने लिहिताना, संदर्भ गोळा करताना घेतलेले कष्ट याबद्दल मनात आदराचीच भावना आहे. तरीही या लिखाणात संवादात्मक, वर्णनात्मक भाग अधिक आणि चिकित्सा फारच थोडी आहे.


    दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, एकच एक पेशव्यांच्या संपूर्ण कालखंडाचा आढावा घेणारं ,सहज उपलब्ध होणारं , सर्वांना माहीत असलेलं असं कोणतंच पुस्तक मराठीत नाही. एक रियासत हा अपवाद वगळता बाकी संपूर्ण कालखंड कव्हर करणारं पुस्तक नाही. त्यामुळे खूपशा गोष्टींची माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचलेली नाही. उदाहरणार्थ बाळाजी विश्वनाथांनी बादशहाकडून छत्रपती शाहू महाराजांसाठी चौथाई आणि सरदेशमुखी साठीच्या सनदा आणल्या, म्हणजे नेमकं काय, त्याचं त्या काळात काय महत्त्व होतं, हे अजूनही खात्रीशीरपणे फार थोड्या वाचकांना सांगता येऊ शकेल. कारण मुळातच चरित्राचा आढावा घेण्याच्या प्रयत्नात त्या त्या व्यक्तीने केलेल्या राजकारणाची मीमांसा तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. वेळ देऊन, अभ्यास करण्याची तयारी असणारा वाचकच रियासतीचा पर्याय स्वीकारतो. इतरांना मात्र ते शक्य होत नाही. त्यामुळे अपुऱ्या माहितीमुळे या राजकारणाबद्दल बरेच गैरसमजही वाढीस लागले आहेत. 

 

   मी स्वतः गेले कित्येक दिवस अशा पुस्तकाच्या शोधात होते, की ज्यात बाळाजी विश्वनाथांपासून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांपर्यंत झालेल्या सर्व पेशवे, प्रत्येकाने केलेलं राजकारण, त्याचे परिणाम हे एकत्र वाचायला मिळेल. श्रीराम साठे यांचं पेशवे मी अजून तरी वाचलं नाही आहे. पण आत्ता काही दिवसांपूर्वी अचानक कौस्तुभ कस्तुरे लिखित पेशवाई हे पुस्तक हाती लागलं. पेशवे या फेसबुक पेजमुळे, आणि रामदास स्वामींना छत्रपती शिवरायांनी दिलेल्या सनदेच्या बातमीमुळे हे नाव परिचयाचं झालंच होतं. त्यामुळे नक्कीच ससंदर्भ आणि अभ्यासपूर्ण लिखाण असणार, अशी आधीच खात्री असल्यामुळे हे पुस्तक लगेच वाचायला घेतलं.


    पुस्तक अपेक्षेप्रमाणे माहितीपूर्ण आहे. अनपेक्षित पण सुखद धक्का म्हणजे पहिल्या प्रकरणात शिवराज्याभिषेकाचं केलेलं विस्तृत वर्णन, तेही संदर्भांची जोड देऊन केलेलं! सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा डोळ्यांपुढे उभा राहिला. महाराजांचा राज्याभिषेक हा आपल्या इतिहासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे सुरुवातीलाच दिलेली ही मानवंदना सार्थ आहे. बाळाजी विश्वनाथ यांच्याबद्दल बरीच माहिती, जी आजपर्यंत फारशी उलगडून सांगितलेली नाही, ती कळायला मदत झाली. शाहू महाराजांचा महाराष्ट्रात परत आल्यानंतरचा संघर्ष हा शून्यापासून विश्व उभं करण्यासारखा होता. ते खरे शाहू नाहीत हा अपप्रचार, महाराणी ताराबाई यांचा विरोध, सरदार आणि सैन्याचं अपुरं पाठबळ या सगळ्या प्रतिकुलतेवर मात करून शाहू महाराज राज्यावर आले. त्या वेळी बाळाजींनी मराठा सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूला वळवण्यात बजावलेली भूमिका विशेष महत्त्वाची ठरली. तो इतिहास खूप विस्तृतपणे सांगितला आहे. पहिल्या बाजीरावांच्या आणि सोबत चिमाजीआप्पांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावाही उत्तम प्रकारे घेतला आहे. सगळ्यांच्या विशेष आवडीच्या बाजीराव-मस्तानी या प्रकरणामुळे थोरल्या बाजीरावांचं एक योद्धा, राजकारणी म्हणून असलेलं कर्तृत्व नेहमी झाकोळलं जातं, हा मराठी कादंबऱ्या वाचल्यामुळे मला नेहमीच येणारा अनुभव आहे. आणि चिमाजीअप्पांना तर सगळ्यांनी लव्ह स्टोरीचा व्हीलन करून ठेवलं आहे. इथे मात्र बाजीराव- चिमाजी या बंधूद्वयींच्या कामगिरीला योग्य न्याय दिला आहे.


    नानासाहेब पेशव्यांचा कार्यकाळ हा सगळ्यात मोठा आणि बऱ्याच अर्थानी महत्त्वाचा आहे. आंग्रे आरमार आणि इंग्रज प्रकरण, शाहू छत्रपतींचा नानासाहेबांच्या कारकिर्दीत झालेला मृत्यू आणि महाराजांनी ठरवून दिलेली राजकारणाची पुढची व्यवस्था, पानिपतची लढाई या राजकीय घडामोडी, त्याचबरोबर नानासाहेबांचा काळ तुलनेने स्थैर्य आणि उत्कर्षाचा काळ असल्यामुळे झालेली त्या काळात झालेली भरभराट याचाही मागोवा घेतला आहे. मराठ्यांच्या राज्यावर टीका करताना एक आरोप मी कायम ऐकला आणि वाचला आहे, तो असा की, मोगलांनी जशा भव्यदिव्य वास्तू निर्माण केल्या, जशी प्रशासन यंत्रणा उभी केली, ते मराठ्यांना जमलं नाही.


     प्रशासनाबाबतच्या आरोपात थोडं तथ्य जरूर आहे, कारण तेव्हाचं राज्य हे संघराज्य होतं. शिंदे, गायकवाड, होळकर आदी सरदार पेशव्यांशी एकनिष्ठ असले, तरी आपल्या प्रांतात ते स्वतंत्रपणे कारभार करत होते. त्यामुळे सर्वत्र एकच व्यवस्था नक्कीच राबवता येऊ शकली नाही. पण पुढच्या विशेषतः पुणे शहराचा आणि तिथल्या पेठांचा विकास, मंदिरांचा जिर्णोद्धार, नव्या मंदिरांची उभारणी हे काम मात्र जरूर झालेलं आहे. तेही वाचायला मिळालं.


     अजून काही वर्षं आयुष्यमान लाभलं असतं, तर सर्व विरोधकांना पुरतं नेस्तनाबूत करून मराठ्यांचा झेंडा ज्यांनी पुढच्या अनेक वर्षे दिमाखात फडकवला असता, असे माधवराव पेशवे हे मला पेशव्यांच्या पराक्रमाच्या वारशाचे शेवटचे अधिकारी वाटतात. हल्लीच ते हिस्टोरिकल लव्ह स्टोरी मटेरियल 2 म्हणून मराठीत नव्याने लाँच केले जात असले, तरी त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं, कौतुक करण्यासारखं स्वामी आणि स्वामिनीपेक्षाही अधिक आहे. पेशवेपदाच्या अल्प कालावधीत पानिपतमुळे झालेली हानी भरून काढून मराठी राज्याची घडी सुरळीत करण्याचं अती महत्वाचं काम त्यांनी पार पाडलं. पण माधवरावांच्या मृत्यूने मराठी राज्याला जी उतरती कळा लागली, ती लागलीच. नारायणरावांची हत्या, राघोबादादांचं बंड आणि इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात झालेला प्रवेश, बारभाई प्रकरण, नाना फडणवीस, महादजी शिंदे यांचा कार्यकाळ, सवाई माधवरावांचं नानांच्या छत्रछायेखाली असणारं पेशवेपद, त्यांचा मृत्यू ही घटनांची मालिका संयतपणे हाताळली आहे. उगाच दोषारोपही केलेले नाहीत, आणि कुणाचं वाजवीपेक्षा अधिक कौतुकही केलेलं नाही. (आनंदीबाई पेशव्यांना आणि मस्तानीबाईंना योग्य न्याय दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद. या दोन बायकांना मराठी कादंबरीकारांनी विनाकारण बदनाम करून ठेवलं आहे.) नानांच्या मृत्यूनंतर आणि त्रिंबकजी डेंगळे यांचा उठाव अयशस्वी झाल्यावर इंग्रजांनी मराठी राज्य कसं यथास्थित मोडीत काढलं, हा दुर्दैवी इतिहासही वाचायला मिळाला. पण वडगावच्या पहिल्या युद्धात मराठे आपल्या गनिमी काव्याच्या ब्रह्मास्त्रामुळे इंग्रजांनाही चीतपट देऊ शकले होते, तोही इतिहास वाचण्यासारखा आहे. पुढे मात्र दूरदर्शीपणा, मुत्सद्देगिरी या गुणांचा आणि कुशल संघटकाचा अभाव, सर्व भेद विसरून एकत्र येण्यास दाखवलेली असमर्थता ही कारणं मराठी राज्य बुडवायला कारणीभूत ठरली. हा इतिहास वाचायला आवडत नसला, तरी तो आपला इतिहास असल्याने सर्वांनी आवर्जून समजून घ्यायलाच हवा. मंत्रावेगळा मधले दुसरे बाजीराव अगदी धोरणी, लढवय्ये वाटतात, तर झुंज मधले बाजीराव कमकुवत वाटतात. दुसरे बाजीराव जसे अपात्र, कुचकामी ठरवले जातात, तसे नसले तरी मराठी राज्याला इंग्रजांच्या रूपाने लागलेली उतरती कळा रोखण्याइतके प्रगल्भ आणि समर्थही नव्हते, हेही लेखकांनी योग्य शब्दांत लक्षात आणून दिलं आहे. एकूण आठ पेशव्यांची कारकीर्द म्हणजेच शाहू महाराज महाराष्ट्रात परत आल्यापासून, सन १७०७ पासून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १८१८ ला इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, तोपर्यंतचं मराठी इतिहासातलं वैभवशाली पर्व उलगडून सांगणारं हे पुस्तक, पेशवाई!


    ससंदर्भ लिखाणाचा एक वीक पॉइंट म्हणजे, ते वाचताना खूप बोअरिंग वाटतं. गजानन भास्कर मेहेंदळे यांचं श्री राजा शिवछत्रपती मी अजून वाचते आहे. पुस्तक अफलातून आहे, अभ्यासपूर्ण इतिहास लेखनाचा आदर्श नमुना आहे. एक वाक्य वाचलं तरी मेहेंदळे सरांपुढे हात जोडावेसे वाटतात. पण ते इतिहासाच्या अभ्यासकासाठी आदर्श पुस्तक आहे. माझ्यासारख्या कधीमधी इतिहास वाचणाऱ्या वाचकासाठी तो एक अवघड पेपर आहे. हे पुस्तकही जरा रुक्ष असेल, असं वाटलं होतं. पण भाषा ओघवती असल्यामुळे दोन दिवसांत वाचून पूर्ण झालं. राघोबादादा पेशवे यांचा अपवाद वगळता, बाकी सर्वांच्या राजमुद्राही या पुस्तकामुळे पाहायला मिळाल्या. इतिहासातील थोर व्यक्तींबद्दल लिहिणाऱ्या लेखकांना " प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" या syndrome ने ग्रासलेलं असतं. याही बाबतीत कस्तुरे सरांची Immunity वाखाणण्यासारखी आहे. संदर्भांशी प्रामाणिक राहून इतिहास लिहिणं, ही आजच्या आपल्या काळात एक दुर्मिळ होत चाललेली कला आहे. ती साधल्याबद्दल लेखकांचं मनपूर्वक अभिनंदन. वाचण्यासारखं तर आहेच, पण जरूर संग्रही ठेवावं असं पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखकांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. शाहमतपनाह बाजीराव पुस्तकाची आता आतुरतेने वाट पाहत आहे, विकत घेऊन वाचायचा संकल्प already केलेला आहे ! 


    आता माझ्या वाचन रडारवर द्रोहपर्व, पेशवे, बाजीराव- चिमाजी, अजिंक्य योद्धा बाजीराव, काका विधातेंचं देवयोद्धा, solstice at Panipat ही काही पुस्तकं आहेत. आमच्या घरात मी "सारखी आपली वाचत असते" म्हणून ओरडा खाते आहे, तेव्हा पुस्तक खरेदीची मोहीम जपून आखावी लागणार आहे. माझ्या वाचनाचा पॅटर्न आता हळूहळू बदलतोय. पूर्वी कादंबऱ्या, त्यातली वर्णनं आवडत होती, आता माहितीकडे जास्त लक्ष असतं. वाचक या भूमिकेतून अभ्यासकाच्या भूमिकेत शिरायला जमायला हवं, ही इच्छा आहे. बघू कसं जमतंय ते! 


©नेहा ज्योती प्रदीप जोशी 

(२७.०९.२०२०)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार