झेप (ना. स. इनामदार) पुस्तक परिचय
पुस्तक परिचय
झेप - ना. स. इनामदार
श्रीमंत पंतप्रधानपदी तत्पर |
मल्हारजीसुत त्रिंबकजी डेंगळे निरंतर ||
काळ कोणताही असो, राष्ट्राच्या इतिहासात दोन प्रकारची माणसं वर्तमान जगून आणि गाजवून आपल्यासाठी एक इतिहास मागे ठेवून जातात. एक राष्ट्र राखण्यासाठी जीवाचं रान करणारी, दुसरी राष्ट्र बुडवण्यासाठी कार्यरत असणारी. पहिल्या लोकांचा मुख्य गुण समर्पण, तर दुसऱ्यांचा स्वार्थ! यात काय कशाला मात देतं, त्यावर साऱ्या राष्ट्राचं भविष्य अवलंबून असतं. राष्ट्र राखण्यासाठी नानविध अचाट आणि अफाट प्रयत्न करू पाहणारी ही माणसं कधी राष्ट्राला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करतात, तर कधी दुर्दैवाचे दशावतार बघून राष्ट्रासह अंधकाराच्या खोल गर्तेत लुप्त होतात. यशाचे हजार धनी असतात, मात्र अपयशाचं पालकत्व कुणालाच पसंत नसतं. यशवंतांचे पोवाडे आणि पराभूतांची हेटाळणी हा समाजाचा अलिखित शिष्टाचारच आहे. मग ही अशी एका मोठ्या ध्येयाचा पाठलाग करताना दमलेली थकलेली माणसं राष्ट्राच्या नाशाला कारण ठरल्याचा कलंक भाळी घेत उपेक्षेचं माप पदरी पाडून घेतात. अशाच एक झुंजार, ध्येयवेड्या पण दुर्दैवी सैनिकाची गोष्ट म्हणजे ना. स. इनामदार लिखीत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे पाटील यांच्या नानाविध चढउतारांनी परिपूर्ण आयुष्याची गोष्ट सांगणारी झेप ही कादंबरी!
पानिपतच्या युद्धाने मराठा साम्राज्याच्या अध:पतनाची जी मालिका सुरू झाली, ती खंडित करण्याचा नव्हे तर पूर्णपणे संपवण्याचा माधवराव पेशवे यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत आटोकाट प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवलं. पण हा स्थिरबुद्धी पेशवा अकाली काळाच्या पडद्याआड गेला आणि भविष्यकालीन अंध:काराची मराठा साम्राज्यावरील सावली अधिक दाट होत गेली. पुढील स्वार्थ, गृहाकलहाच्या चक्रावर मात करून पेशवेपदावर विराजमान झाले ते दुसरे बाजीराव पेशवे. पण तोपर्यंत अंतर्गत फाटाफूटीचं बीज मराठा साम्राज्याच्या खूप खोलवर रुजू घातलं होतं, आणि हे बीज खतपाणी देऊन वाढवत होते, ते म्हणजे सातासमुद्राहून व्यापारासह उभ्या भारताला घशात घालायला आलेले टोपीकर इंग्रज! अर्थात इंग्रजांकडे ना स्वतःची लाखोंची फौज होती, ना भलामोठा खजिना. त्यांच्या कामी आला तो आपल्याच मातीला असलेला फितूरीचा आणि स्वार्थाचा शाप. पण अर्थात सारी प्रजा फितूर नव्हती, त्यातही काही आपल्या आवाक्याबाहेरची उडी घेऊन राष्ट्र राखण्यासाठी झुंजणारे निधड्या छातीचे शिपाईगडीही होतेच! त्यातले एक त्रिंबकजी डेंगळे.
एक सामान्य बारगीर ते पेशव्यांचा विश्वासू कारभारी ही त्रिंबकजीची प्रगती त्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला भाग पाडेल, अशीच आहे. एकीकडे आत्मतेज हरवून बसलेल्या लोकांना स्वातंत्र्य आणि इंग्रजांच्या रुपात घराच्या उंबरठ्यापावेतो आलेलं पारतंत्र्य यात फरक समजत नव्हता, तर दुसरीकडे त्रिंबकजीसारखे शिपाई इंग्रजांना ते जिकडून आले त्याच समुद्रात बुडवण्याचे मनसुबे रचत होते. मुळात ही कादंबरी आहे, ललित लेखन आहे. यात नायकाचं पात्र रंगवण्यासाठी लेखकाने प्रयत्न करणे, अगदीच स्वाभाविक आहे. पण तरीही त्रिंबकजीचे स्वराज्य राखण्यासाठी चाललेले अविश्रांत परिश्रम हे नक्कीच खरे आहेत. इतिहासाने त्यांची नोंद घेतली आहे. फक्त दुर्दैव हेच, की या प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. सगळ्या मातब्बर मराठा सरदारांची, लढवय्या पेंढारी लोकांची एक वज्रमूठ करून इंग्रजांना या भूमीतून कायमचं हद्दपार करण्याचं त्रिंबकजीचं मनोरथ पूर्ण होऊ शकलं नाही. इंग्रजांना डोईजड झालेला हा सैनिक आपल्याच माणसांच्या फितुरीमुळे इंग्रजांच्या जाळ्यात अडकला ,आणि राष्ट्र राखण्यासाठी प्राणपणाने लढणारा हा योद्धा पेशवाईच्या अधोगतीचं एक कारण बनून गेला. डेंगळेंचा प्रमुख हेर बयाजी नाईक इंग्रजांना सामील झाला. मनात आणलं तर एक हेर एक काय काय करू शकतो, याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेतच. अगदी बहिर्जी नाईक असोत, नाहीतर आपले अजित डोवल असोत ! हा बयाजी मात्र एक चुकीचं उदाहरण बनून गेला. आपल्याच माणसांनी दगा दिला आणि रचलेले सारे मनसुबे धुळीला मिळाले. त्यात इंग्रजांनी त्रिंबकजीला आमच्या हवाली करा, नाहीतर आम्ही पुण्यावर हल्ला करू, हे दबावतंत्र वापरलं. जे राज्य राखण्यासाठी आपण सारं आयुष्य वेचलं, तेच आपल्यापायी युद्धात होरपळून जाऊ नये, म्हणून त्रिंबकजी आपणहून इंग्रजांच्या स्वाधीन झाला. इमानाचा भीषण दुष्काळ पडलेला असताना हा तेजस्वी मोहरा आपण गमावला.
एकूणच त्या काळातले सगळे मातब्बर मराठा सरदार, त्यांची आणि पुण्यातील एकूण स्थिती या गोष्टी समजून घ्यायला आपल्याला या पुस्तकामुळे नक्कीच मदत होईल. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ही एक कादंबरी आहे, मूळ इतिहास नाही. समग्र इतिहास नव्हे, पण त्याची एक सामान्य कल्पना यायला या कादंबरीचा नक्कीच उपयोग होईल. दुसरे बाजीराव, वाराणसीबाई, सरदार गायकवाड, गोखले, सदाशिवपंत माणकेश्वर, बाळाजीपंत नातू, खरशेठ मोदी, इंग्रज एलफिन्स्टन, गंगाधरपंत शास्त्री आणि इतर अनेक व्यक्ती या पुस्तकात आपल्याला भेटतील. पुस्तकाची भाषा अगदी सरल पण थेट त्या काळात घेऊन जाणारी आहे. त्रिंबकजीचे आपली पत्नी चंद्रा, बाळाजीपंत नातू, हैबतबाबा यांच्याबरोबर झालेले संवाद त्याची अजोड स्वामीनिष्ठा, आणि त्याच्या कल्पनेची विलक्षण भरारी उलगडून दाखवतात. शेवटी आपल्या कट्टर शत्रूला स्वाधीन झालेला त्रिंबकजी डोळ्यांत पाणी आणतो आणि मनाला रुखरुख लागून जातो. त्याच निमित्ताने काही जर-तरच्या शक्यता मनात घर करतात. इतिहासात या शक्यतांचं मोल शून्य, पण आपल्या मनाला त्या विलक्षण सुख देतात. उदाहरण द्यायचं झालं तर,
१)शिवाजी महाराजांना तेव्हाच सगळ्या मराठी जनांचा एकमुखी पाठिंबा मिळाला असता तर? त्यांचा अमूल्य वेळ आपल्याच लोकांशी झुंजण्यात वाया गेला नसता तर?
२) संभाजी महाराजांना आपल्याच लोकांनी दगाफटका केला नसता तर?
३) मराठे पानिपत जिंकले असते तर?
४) पेशवा बाजीराव, माधवराव यांना अजून आयुष्य लाभलं असतं तर?
त्याच धर्तीवर त्रिंबकजीचा इंग्रजांना कायमचं हद्दपार हद्दपार करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर? ही एक शक्यता मनात निर्माण होते. बाकी काही नाही, पण आपल्या कर्तृत्वामुळे ज्या त्रिंबकजीनी ही शक्यता निर्माण केली, त्याच्या जीवनगाथेला साजेल असा चरित्राचा मान देणारे हे पुस्तक, झेप! दुर्दैव, या गरुडाचे पंख अवेळी छाटले गेले आणि भरारी केवळ स्वप्नातच उरली. त्या अयशस्वी भरारीची गोष्ट म्हणजे झेप !
या कादंबरीतला त्रिंबकजी बाणेदार आहे, स्वाभिमानी आहे, स्वामिनिष्ठ आहे, धन्याच्या हितासाठी स्वतःकडे वाईटपणा घ्यायलाही न कचरणारा आहे, कुटुंबवत्सल आहे, आळंदीच्या माऊलींवर अजोड श्रद्धा ठेवणारा आहे, पण आपल्याच अवतीभवती लपलेल्या फितुरांना ओळखू न शकलेला दुर्दैवी मुत्सद्दी आहे. आता खरा इतिहास काय आहे, ते जाणून घेण्यासाठी रियासत वाचायला घेते आहेच. पण आपल्या राजसत्तेच्या रक्षणासाठी जी जान पणाला लावून लढणारा हा कादंबरीतला नायक त्रिंबकजी स्वाभिमानाची, निष्ठेची एक मिसाल म्हणून माझ्या दीर्घकाळ लक्षात राहील!
- नेहा ज्योती प्रदीप जोशी.
(१४.२.२०२०)

Comments
Post a Comment