वंदे गुरू परंपरा

वैभवशाली सनातन परंपरेला समर्पित १० वर्षे

एखाद्या YouTube channel ची दहा वर्षे पूर्ण झाली, याचा ते चॅनेल ज्याचं आहे तो सोडून बाकी कुणालाही मनापासून आनंद होणं ही एक फारच rare गोष्ट आहे. कारण आज हर तऱ्हेच्या content creators चा अगदी सुकाळू आहे. तुमची जी आवड असेल त्या दिशेने तुम्हाला अक्षरशः खेचून नेणारा content तुम्हाला इथे दिसेल. अशा काळात जो बिकता है वही यहा टिकता हैं असा अघोषित मूलमंत्र असणाऱ्या या माध्यमाचा विधायक कामासाठी वापर करुन नावारूपाला आलेलं चॅनेल म्हणजे कुलदीप मुरलीधर पै यांचं चॅनेल जे Vande Guru Parampara या spiritual music series साठी ओळखलं जातं. 

मूळचे केरळचे कुलदीपजी भारतीय शास्त्रीय संगीतातले गोल्ड मेडलिस्ट आणि साउंड इंजिनियर आहेत. ते स्वतः व्हायोलिन, पियानो, मृदुंग, हार्मोनिअम, बासरी ही वाद्ये उत्तम वाजवतात. अद्वितीय या त्यांच्या अल्बममधे त्यांनी गायनाबरोबर व्हायोलिन, मृदंग, घटम, कांजिरा, तबला, हार्मोनियम आणि मेलोडिका या वाद्यांचं वादनही केलं आहे. पण २०१४- १५ पासून त्यांनी आपले गुरु स्वामी श्री रमणचरण तीर्थ यांच्या प्रेरणेतून सुरु केलेल्या ' वंदे गुरू परंपरा ' या spiritual music series मुळे आज त्यांचं नाव सर्वश्रुत झालं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही वर्षांपूर्वी viral झालेलं छोटया सूर्यगायत्री आणि स्वतः कुलदीप यांनी स्वरबद्ध केलेलं गणेश पंचरत्न स्तोत्र कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. त्या व्हिडिओपासूनच या चॅनलचा श्रीगणेशा झाला. मुळात हे असं स्तोत्र आहे हेच बऱ्याच जणांना या व्हिडिओमुळे समजलं. आणि तिथून सुरु झाला हा संस्कृती आणि संगीताचा एकत्रित प्रवास. 

कुलदीपजींच्या चॅनेलचा कंटेंट म्हणजे आपल्या देवदेवतांची  स्तोत्रं, गीतं - काही सर्वांना माहीत असलेली तर काही जुनी किंवा विस्मरणात गेलेली. हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यत योग्य वेळी पोहोचावा अशा पद्धतीने ते प्रसंगानुरुप release करतात, म्हणजे शिवरात्रीआधी शिवस्तुती, नवरात्रीआधी अयगिरी नंदिनी हे २० कोटीच्या वर views मिळालेलं महिषासुरमर्दिनी स्तोत्र, तर २०२३ ला भारताच्या अध्यक्षतेत झालेल्या G20 समिटपूर्वी वसुधैव कुटुंबकम अशी बरीच उदाहरणं देता येतील. हा मार्केटिंग जिनीअसचाही उत्तम नमुना आहे. श्री आदिशंकराचार्य, सदाशिव ब्रह्मेंद्र, भद्राचल रामदास, अय्यप्पा दीक्षितार, कबीर, सूरदास, पुरंदरदास रचित संस्कृतसह तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, मराठी, हिंदी, अवधी, गुजराती आणि बंगाली भाषेतली स्तोत्रं, अभंग आणि भजनं हा VGP चा content आहे.  इथले कंटेंट क्रिएटर्स म्हणजे पहिल्याच व्हिडिओद्वारे सर्वांची लाडकी झालेली गायिका सूर्यगायत्री, राहूल वेल्हाळ, स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात भगवद्गीता आणि विष्णुसहस्त्रनाम म्हणणारा ईशान पै, रघुराम, भाव्या, कानडा राजा पंढरीचाचं recent times मधलं अतिशय सुंदर reprise गायलेल्या पूर्वा आणि पावनी असे बरेच बालकलाकार हे नुसतेच गायक किंवा गायिका नाहीत तर आपल्या समृद्ध वारशाचे brand ambassadors आहेत. अजून एक विशेष म्हणजे प्रत्येक व्हिडिओत देवनागरी लिपीतले आणि इंग्लिश उच्चार आणि translation दिलेलं असतं. आपण ऐकतो ते काय त्याचा नेमका अर्थही यामुळे सहज समजतो. हाताशी असलेलं medium कसं अचूक वापरायचं आणि त्यातून नेमकं काय साध्य करायचं याची १००% clarity असली की एखादा क्रिएटर काय चमत्कार करु शकतो, त्याचं हे बोलकं उदाहरण आहे. 

VGP माझ्या  daily life चा अगदी अविभाज्य भाग आहे, कारण त्या त्या दिवसानुसार अगदी घरभर आवाज पोहोचेल इतक्या full volume मधे गाणी लावल्याशिवाय माझी देवपूजा सुरूच होत नाही. गेले काही वर्षं माझी सकाळ या स्तोत्रांनी प्रसन्न आणि सुमधुर केली आहे. स्तोत्र पाठ करायला वेगळे efforts घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही, पण ४- ५ मिनिटाचा video play करण्याइतका वेळ आपल्याकडे नक्कीच असतो. इतके वेळा ऐकल्यामुळे गणेश पंचरत्न स्तोत्र, शिव पंचाक्षर स्तोत्र, रुद्राष्टक, महालक्ष्मी अष्टक, भवानी अष्टक, दुर्गा चालीसा मला नुसती ऐकूनच पाठ झाली आहेत. लहानपणी आजीकडून शिकले होते त्यावर आता VGP मुळे ही स्तोत्रं पाठ झाली. 

गेल्या नवरात्रात आपल्या माननीय पंतप्रधानांनीसुद्धा त्यांच्या offical ट्विटर अकाऊंटवर VGP चं महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि अंबा स्तवन शेअर केलं होतं. गेल्या दहा वर्षांत आपल्या व्हिडिओतूंन अशी कित्येक स्तोत्ररत्नं लोकांपर्यत पोहोचवण्याचं VGP चं काम म्हणजे मला देवाचं काम वाटतं. हे नुसतंच content creation नाही तर प्रत्येक सश्रद्ध हिंदूला आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक ठेव्याकडे जाणारा रस्ता प्रकाशमान करण्यासाठी दिलेलं भरीव योगदान आहे. ३० लाखाच्या वर subscribers आणि १४३ करोडच्यावर original view मिळवलेलं हे चॅनेल अजून खूप नावारूपाला यावं, अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. 

स्पष्ट भाषेत बोलायचं तर बरेच आलतू फालतू टुकार क्रिएटर्स या न त्या प्रकाराने स्वतःला promote करत असतात. फेमस होण्यासाठी वाट्टेल तो विषय वाट्टेल ती थीम घेऊन अक्षरशः काहीही करणारे आणि त्यांना डोक्यावर घेणारे असे दोन्ही प्रकारचे नग आपण रोज बघतोय.अशा उथळ आणि सवंग "content" च्या रोज नव्याने साचणाऱ्या दलदलीत आजवरच्या प्रत्येक (एकूण १०० पेक्षा जास्त)व्हिडिओत केवळ आणि केवळ सनातन परंपरेचा पुरस्कार आणि प्रचार करणारं वंदे गुरू परंपरा नक्कीच वेगळं आहे आणि म्हणूनच ते कौतुकास पात्र आहे. माझ्या ओळखीतल्या प्रत्येकाला मी हे आवाहन करेन, की अशा चांगल्या कंटेंटला support करा. माझा हा लेख वाचून VGP चा एक view जरी वाढला तरी मला मनापासून आनंद होईल. 

कुलदीप मुरलीधर पै आणि त्यांच्या सगळ्या टीमला खऱ्या अर्थाने एक दर्जेदार spiritual channel निर्माण केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा! 

आज सोमवार म्हणून या चॅनलवरची शिवस्तुतीची लिंक दिली आहे. ती तर ऐकाच आणि बाकीही बरंच काही आहे जे एकदा तरी ऐकावं आणि ऐकत राहावं असं आहे. 

🖋️नेहा जोशी गोडबोले

Comments

  1. नेहा वंदे गुरु परंपरा हा विषय तू निवडलास याबद्दल अभिनंदन! गुरु परंपरेचा अभिमान असणं आणि त्या पथावर चालणं हे आजची पिढी विसरत चालली आहे. कुलदीपजी नव्या पिढीला वाट दाखवतात. खरंच खूप चांगला सोर्स आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार