गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा (भाग १)
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण पहिले पुस्तकं निर्जीव नसतात. उलट ती चांगलीच सजीव, रसरशीत असतात. फक्त त्यांचं हे मर्म जाणून त्यांच्याकडे पाहणारा वाचक असावा लागतो. मग वाचन हीसुद्धा एक निर्जीव, शब्द वाचण्याची प्रक्रिया राहत नाही. तो एक संवाद होऊन जातो. लायब्ररीतली पुस्तकं मला खाणाखुणा करतात, असा माझा तरी अनुभव आहे. लायब्ररीत गेले की माझी नजर मोजक्या सात आठ पुस्तकांवर जातेच. त्यात पहिलं म्हणजे गीतारहस्य, पण ते वाचण्याइतकी माझी अजून तयारी नाही. तुकाराम गाथा,स्वामी, मैत्रेयी, मोगरा फुलला, मर्मभेद आणि बरीच मनात घर केलेली पुस्तकं पाहिली, की मला आवडते नातेवाईक भेटल्यावर वाटतं तसं होतं. गेले काही दिवस एक बाई मला अशा खाणाखुणा करत होत्या. दर वेळी समोरचा शेल्फ उघडला की गारंबीची राधा समोर दिसायची. एका बैठकीवर बसलेली सालंकृत लेकुरवाळी बाई असं मुखपृष्ठावर चित्र आहे. गारंबीचा बापू माहीत नाही, असा मराठी वाचक मिळणं दुर्मिळ आहे. अगदी वाचून माहीत नसला तरी ऐकून, कुणाला तरी घाणेकरांचा पिक्चर पाहून गारंबीचा बापू ओळखीचा झालेला असतोच. मलाही ती ओळख काही वर्षांपूर्वी झालेली होतीच. म्हणजे गोष्ट नक्की आठवत होती...