वारसा: नरहर कुरुंदकर
#पुस्तकांच्या_पानांवरुन काही पुस्तकं आकाराने खूप छोटी असतात, पण वाचता वाचता संपत नाहीत. थोडक्याच शब्दांत आशय इतका ठासून भरलेला असतो, की वाचणाऱ्या व्यक्तीचा कस लागला पाहिजे. यावेळी वाचलं ते पुस्तक अशा प्रकारचं होतं. नरहर कुरुंदकर हे नाव खूप ऐकूनसुद्धा आजतागायत त्यांचं कोणतंच साहित्य मला वाचायला मिळालं नव्हतं. गेल्या आठवड्यात शेवटी एकदाचा हा दुष्काळ संपला, आणि माझ्या हाती पडलं ते त्यांचं वारसा हे पुस्तक. अगदी साजेशा नावाचं, महाभारताशी संबंधित विविध घटकांचा तर्कशुद्ध आढावा घेणारे चार लेख यात समाविष्ट आहेत. पहिला लेख डॉक्टर सुखटणकर यांनी संपादित केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्ती विषयी आहे. महाभारत हा विषय समग्र भारतातल्या जनमानसात इतका खोलवर रुजलेला असल्यामुळे; प्रांत, भाषा, संस्कृती नुसार अनेक प्रकारच्या कथा, दंतकथांची भर वेळोवेळी मूळ कथानकात पडत गेली आहे. त्यातून सध्या आपल्यासमोर असणारं महाभारत यातील मूळ कथानक आणि प्रक्षिप्त भाग अशी वर्गवारी करताना आलेल्या अडचणी अनेक प्रकारच्या आहेत. त्यातून मार्ग काढत डॉक्टर सुखटणकर यांनी ...