झेप (ना. स. इनामदार) पुस्तक परिचय
पुस्तक परिचय झेप - ना. स. इनामदार श्रीमंत पंतप्रधानपदी तत्पर | मल्हारजीसुत त्रिंबकजी डेंगळे निरंतर || काळ कोणताही असो, राष्ट्राच्या इतिहासात दोन प्रकारची माणसं वर्तमान जगून आणि गाजवून आपल्यासाठी एक इतिहास मागे ठेवून जातात. एक राष्ट्र राखण्यासाठी जीवाचं रान करणारी, दुसरी राष्ट्र बुडवण्यासाठी कार्यरत असणारी. पहिल्या लोकांचा मुख्य गुण समर्पण, तर दुसऱ्यांचा स्वार्थ! यात काय कशाला मात देतं, त्यावर साऱ्या राष्ट्राचं भविष्य अवलंबून असतं. राष्ट्र राखण्यासाठी नानविध अचाट आणि अफाट प्रयत्न करू पाहणारी ही माणसं कधी राष्ट्राला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करतात, तर कधी दुर्दैवाचे दशावतार बघून राष्ट्रासह अंधकाराच्या खोल गर्तेत लुप्त होतात. यशाचे हजार धनी असतात, मात्र अपयशाचं पालकत्व कुणालाच पसंत नसतं. यशवंतांचे पोवाडे आणि पराभूतांची हेटाळणी हा समाजाचा अलिखित शिष्टाचारच आहे. मग ही अशी एका मोठ्या ध्येयाचा पाठलाग करताना दमलेली थकलेली माणसं राष्ट्राच्या नाशाला कारण ठरल्याचा कलंक भाळी घेत उपेक्षेचं माप पदरी पाडून घेतात. अशाच एक झुंजार, ध्येयवेड्या पण दुर्दैवी सैनिकाची गोष्ट म्हणजे ना. स. इनामदार...