पुस्तक परिचय : मैत्रेयी ( लेखिका अरुणा ढेरे )
मैत्रेयी लेखिका : अरुणा ढेरे प्रकाशक : सुरेश एजन्सी पृष्ठसंख्या : ८६ पुस्तक परिचय: एखादं पुस्तक वाचून झाल्यावर किंवा वाचत असताना येणारे अनुभव, ही एक वेगळीच कथा असते. आणि प्रत्येक पुस्तकाची अशी एक खास कथा असतेच. पुस्तक वाचन याबरोबरच माझा दुसरा आवडता छंद म्हणजे पुस्तकांची नावं गोळा करणे! थोडं विचित्र वाटेल, पण मला कुठेही एखादं पुस्तक किंवा लेखक यांपैकी काही नवं निदर्शनास आलं, की ते मी वहीत लिहून ठेवते. सगळी पुस्तकं वाचायला जमेलच असं नाही, पण प्रयत्न तरी तसाच असतो. आत्ता वाचलेलं पुस्तक , अरुणा ढेरे लिखित मैत्रेयी, याची पण अशीच खास गोष्ट आहे. साधारण ३-४ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजला अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक सरांचं लेक्चर होतं. आम्ही थोड्या नाईलाजानेच गेलो, पण सरांनी तर एका अर्थी आमचा अपेक्षाभंग केला. आमची कल्पना अशी, की अर्थशास्त्र म्हणजे one sided उपदेश गाथा यातलं काहीतरी, जागं राहता आलं तरी पुष्कळ! पण सर इतके छान बोलत होते,की आम्हीही लहान मुलं गोष्ट जितकी मन लावून ऐकतात, तसं अगदी एका अर्थी तल्लीन होऊन ते लेक्चर ऐकत होतो, सरांना प्रश्न विचारत होतो, सरही खूप छान माहिती देत होते. आणि...